भाजपचा पराभव होणारच; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा दावा निवडणूक आयोग पक्षपाती

Foto

नवी दिल्‍ली: सर्जिकल स्टाईक, नोटाबंदी, राफेल विमान घोटाळ्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आज पुन्हा एकदा निशाणा साधला. नरेंद्र मोदींनी सर्जिकल स्ट्राईक केले नाही तर भारतीय लष्कराने केले आहे. सर्जिकल स्ट्राईक आपल्या सरकारने केल्याचे सांगत मोदी हे सैनिकांचा अपमान करत आहेत, असे सांगून, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणारच, असा दावाही गांधी यांनी केला. देशातील निवडणूक आयोग पूर्णपणे एकांगी व पक्षपाती असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नवी दिल्‍ली येथील काँग्रेस मुख्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी भाजप व पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करणे अशक्य असल्याची चर्चा पाच वर्षांपूर्वी सुरू होती. मात्र, काँग्रेसने हा समज आता मोडीत काढला आहे. लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या चार टप्प्यांनंतर मोदींचा-भाजपचा पराभव होणार हे स्पष्ट झाले आहे. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत. शेतकरी, भ्रष्टाचार, रोजगार हे  यंदाच्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे आहेत, असे त्यांनी सांगितले.

मोदींना काँग्रेसने उद्ध्वस्त केले असून, आज तुमच्यापुढे जे दिसतेय, तो केवळ पोकळ सांगाडा आहे. आणखी 15 ते 20 दिवसांत तोही कोसळणार असल्याचे सांगून ते म्हणाले, 2 कोटी रोजगार देण्याचे आश्‍वासन भाजपने दिले होते;परंतु ते फोल ठरले. मोदी सरकारच्या काळात नवीन रोजगार निर्मिती तर झाली नाहीच;उलट बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आमचा मुख्य मुद्दा रोजगारीचा आहे. मोदी सरकारने केलेली नोटाबंदीची योजना फसली असून, त्याला काँग्रेसची न्याय योजना उत्तर देणार आहे. न्याय योजनेद्वारे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचा आगामी पंतप्रधान कोण असेल, या प्रश्‍नावर उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, निवडणूक जिंकणे हे काँग्रेसचे लक्ष्य असून पंतप्रधान कोण होणार, हे जनताच ठरवेल. देशातील जनता जे ठरवतील, तो पंतप्रधान मला मान्य असेल. मात्र, सध्या माझे काम हे देशाच्या संस्थांना वाचवणे हे आहे.

पुलवामा, पठाणकोटमधील दहतवादी हल्‍ला, नवी दिल्‍लीतील संसद भवनावरील हल्‍ला व इतर दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ङ्गजैश-ए-मोहम्मदफ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या क्रूरकर्मा मसूद अझहरला भाजप सरकारने देशाबाहेर सोडले. मसूद अझहरची सुटका भाजप सरकारच्या काळातच झाली होती, असा आरोप करून, काँग्रेसने कधीही दहशतवाद्याला सोडले नव्हते, असा दावा त्यांनी केला. मसूद अझहर हा दहशतवादी आहे, त्याच्याविरोधात कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. गेल्या पाच वर्षांत नरेंद्र मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. ते घाबरतात. दबाव आला की, पळून जातात, असा त्यांचा स्वभाव आहे, अशा शब्दात राहुल यांनी मोदींवर हल्‍लाबोल केला. चौकीदार चोर है, या वक्‍तव्याप्रकरणी मी सुप्रीम कोर्टाची माफी मागितली आहे ,भाजपचे नाही. राफेल विमान करारातून चौकीदाराने 30 हजार कोटींची चोरी केल्याचा आरोपही त्यांनी नरेंद्र मोदींवर केला. चौकीदार चोर आहे हे खरे आहे. चौकीदाराने हजारो कोटी रुपये त्याच्या उद्योगपती मित्रांच्या खिशात टाकले. पंतप्रधानांकडे तज्ज्ञमंडळी नाहीत, जी आहेत त्यांचा वापर केला जात नाही. त्यामुळेच राफेल करारावर मोदी माझ्यासोबत खुली चर्चा करत नाहीत, असेही गांधी म्हणाले. सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेणार्‍या मोदी सरकारचा समाचार घेताना गांधी म्हणाले, सर्जिकल स्ट्राईक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले नाही, भारतीय सैन्याने केले आहे. भारतीय सैन्य ही मोदींची खासगी संपत्ती नाही, सैन्य हे देशासाठी आहे. जर मोदी सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे श्रेय घेत असतील तर हा भारतीय सैन्याचा अपमान आहे. भारतीय सैन्याची 70 वर्षांची कामगिरी बघा, त्यांना नेहमी यशच मिळाले आहे. सैन्याच्या कामगिरीवरून राजकारण करणे चुकीचे आहे, पंतप्रधानांनी तरी किमान सैन्याचा अपमान करू नये, अशी टीका त्यांनी केली.